Road to the Nature that is full of Life

बोल मेरी तकदीर में क्या है
मेरे हमसफर अब तो बता
जीवन के दो पहलू है
हरियाली और रास्ता..
या गीताप्रमाणेच रस्तेबांधणी म्हटल्यावर ‘विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास’ असं एक द्वंद्व हमखास उभ ठाकतं. त्यातही एखाद्या महामार्गाच्या चार वा सहा पदरीकरणाचा विषय असला तर त्यात होणारी हजारो झाडांची कत्तल, डोंगरांचं सपाटीकरण यासारखे मुद्दे नेहमीच वादग्रस्त बनतात. सुरुवातीला वाद, चर्चा, विरोध भरपूर होतो, पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही, हा आजवरचा सार्वत्रिक अनुभव. मुंबई-आग्रा महामार्गाच्या ठाणे-नाशिक-धुळे या टप्प्यातील रुंदीकरणाचा प्रस्ताव आल्यावर हे सारे यथासांग पार पडलेच. रस्त्याचे काम वेग घेऊ लागले तसा विरोधही तीव्र होऊ लागला. पण केवळ विरोधासाठी विरोधाची मानसिकता न बाळगता लोकसहभागातून या महामार्गाच्या परिसरात तब्बल एक कोटी बीजरोपणाचे ‘रुजवाई’ अभियान राबविण्यासाठी ‘हरियाली’ संस्था सरसावली. ते पाहून विरोधाचा सूर क्षीण होत गेला अन् रचनात्मक कामासाठी सहकार्याचे अनेक हात पुढे आले. परस्परसहकार्याच्या माध्यमातून हा संकल्प सिद्धीस गेला तर ती या रस्त्याची एक खासीयत ठरेलच, शिवाय इतरांसाठीही तो आदर्श ‘पॅटर्न’ ठरेल.
आज ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ हा सर्वत्र परवलीचा शब्द बनला आहे. त्याचा मूलाधार रस्ता असल्याने रस्तेविकासाला प्रचंड वेग आला आहे. हे करताना वृक्षांची तोड अपरिहार्य ठरते. साहजिकच पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. सध्या मुंबई-आग्रा महामार्ग रुंदीकरणाचा ‘मेगा प्रोजेक्ट’ हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘विकास विरुद्ध पर्यावरण’ या वादाचे सूर आळवले जात आहेत. अशावेळी अनिल अवचटांच्या ‘सृष्टीत.. गोष्टीत..’ पुस्तकातली ‘रस्ते-वेड’ ही रूपककथा आठवल्याशिवाय राहत नाही. माणसाचं रस्ते बांधण्याचं वेड आणि त्यामुळे निसर्गाची लागणारी वाट यावर गोष्टीत प्रकाश टाकला आहे. मोठमोठे रस्ते बांधण्यात कॉन्ट्रॅक्टर, नोकरशहा, राजकारणी यांचे खिसे भरतात. मात्र जंगलं, डोंगर रिते होत जातात. दणक्यात सुरू असलेल्या अशा कामांमुळे झाडं, डोंगर हताश होतात. रस्तेबांधणीचा हव्यास वाढत चालल्याचं पाहून अखेर किडामुंग्यांपासून जमिनीपर्यंत निसर्गातले सगळे घटक एकत्र येतात. ठरल्यानुसार जमीन हालचाल करते. त्यामुळे रस्त्यांना भेगा पडतात. त्यातून माती बाहेर येते. बॅक्टेरिया जमीन भुसभुशीत करतात. बिया रुजतात. ढग पाऊस पाडतात. आणि बघता बघता एके दिवशी रस्त्याच्या या भेगांतून नवी सृष्टी जन्म घेते. जगभरात सर्वत्र हे होत असल्यानं माणूस गोंधळून जातो. जमीन त्याला खडसावते, ‘माझ्या पोटातले इंधनाचे साठे संपलेत. अन् आता रस्तेही नाहीत. मग कशी चालवणार तुझी वाहनं? कुठे जाणार रस्ते नसताना?’ हे ऐकून माणसांतली चांगली माणसं पुढे येतात. आपण याआधी हेच पटवून देत असल्याची आठवण करून देऊन, आता आहे तिथेच थांबून यापुढे निसर्गाची हानी न करता जगण्याचं आश्वासन देतात. मग ही कोंडी फुटते आणि जंगलं पुन्हा बहरू लागतात.. अशा आशयाची ही रूपककथा. त्यातलं भाष्य मार्मिक जरूर आहे; मात्र आजच्या जमान्यात ते सगळ्यांना रुचेलच असं नाही.
झाडं तर हवीतच; पण अगदी रस्त्याच्या कडेला त्यांची काय गरज आहे? पूर्वीच्या काळी पायी किंवा हत्ती-घोडय़ांवर स्वार होऊन प्रवास करताना रस्त्याच्या कडेला सावली व निवाऱ्यासाठी झाडं उपयोगी ठरायची. आज आधुनिक वाहनांच्या जमान्यात उलट रस्त्यापासून काही अंतर राखूनच झाडं असावीत, हा विचार मांडला जातो. गतिमान वाहनांमुळे अलीकडे प्रवासाचा पॅटर्नच बदलला आहे. पांथस्थांप्रमाणे ठराविक अंतरावर थांबून झाडाखाली विश्रांतीची गरज उरलेली नाही. शे-दीडशे कि.मी.चे अंतर अडीच-तीन तासांत कापले जाते. विश्रांतीसाठी रस्त्याच्या बाजूला हॉटेल्स असतात. त्यामुळे रस्त्यालगतच्या झाडांची तशी निकड राहिलेली नाही. उलट, रस्त्याला खेटून असणाऱ्या झाडांमुळे प्रवासादरम्यान निर्माण होणारे अडथळे, वळणावर चालकाला समोरून येणाऱ्या वाहनांचा नीट अंदाज न येणे, रात्रीच्या वेळी झाडांवर वाहने धडकून होणारे अपघात, झाडांच्या फांद्या पडून ठप्प होणारी वाहतूक, झाडांची मुळे खोलवर शिरल्याने रस्त्यांना पोहचणारी हानी पाहता रस्त्यापासून २५ ते ३० मीटर लांब झाडे लावावीत, असा ‘प्रॅक्टिकल’ विचार होत आहे. अमेरिका-युरोपात अशी रस्तेबांधणी होत असल्याचा दाखलाही याकरता दिला जातो. या दोन्ही परस्परविरोधी टोकाच्या भूमिका पाहता त्यातून सुवर्णमध्ये काढण्याच्या उद्देशाने ‘हरियाली’ संस्थेने मुंबई-आग्रा महामार्गाच्या ठाणे ते धुळे या पट्टय़ात रस्त्याला अडथळा येणार नाही, अशा रीतीने येत्या पावसाळ्यात तब्बल एक कोटी बिया रुजविण्याचे अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी पाहणी दौरा, स्थानिक मंडळींशी संपर्काची एक फेरी पूर्ण झाली आहे. या उपक्रमाला परिसरातल्या वृक्षप्रेमींकडून लाभणारा प्रतिसाद आशादायी आहे. शिवाय, फक्त बीजारोपण करून भागणार नाही, तर सुरवातीला झाडांची काळजी घ्यावी लागेल, ती जगवावी लागतील. हे लक्षात घेऊन झाडे नेमकी कुठे लावायची, त्यांची काळजी कुणी घ्यायची, याबाबतचे नियोजन सुरू आहे. याबाबतचा डोंगरमाथ्यांवर, माळरानांवर, पंढरीच्या वारीच्या मार्गावर केलेले वृक्षारोपण व पर्यावरणसंवर्धनाचा दीर्घ अनुभव संस्थेच्या गाठीशी आहे. त्यामुळेच महामार्ग परिसरात या पावसाळ्यात तब्बल एक कोटी बिया रुजविण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा आत्मविश्वास ‘हरियाली’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. अर्थात त्यासाठी त्यांना हवं आहे स्थानिकांचं सहकार्य. हा उपक्रम कुणा एका व्यक्ती वा संस्थेचा नाही, तर तो सर्वाचा आहे. त्यामुळे त्यासाठी केवळ सरकारी योजना किंवा मदतीवर अवलंबून न राहता, हे आपलेच काम समजून प्रत्येकाने त्यात सहभाग द्यावा, अशी अपेक्षा आहे. या अनुषंगाने आपल्या भागात विविध उपक्रम, नव्या संकल्पना राबविणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून तिथे त्यांच्या नावाचे फलक लावले जातील. तसेच रोपणानंतर झाडांची निगा कशी राखली गेलीय, याचे परीक्षण करून स्पर्धात्मकतेलाही उत्तेजन दिले जाणार आहे. महामार्गासाठी जेवढी वृक्षतोड झालीय त्याच्या कित्येक पटीने या परिसरात वृक्षलागवड करून मृतप्राय निसर्ग पुन्हा एकदा सचेतन करण्याचा हा संकल्प आहे. त्यासाठी बियांची तजवीज तसेच इतर मदत व मार्गदर्शन ‘हरियाली’ करणार आहे. ही एक अनोखी व अपूर्व अशी संधी चालून आल्याने त्याचा पुरेपूर लाभ घेतला जायला हवा. केवळ विरोधासाठी विरोध किंवा सरकारी धोरणांवर टीका-टिप्पणी करत बसण्यापेक्षा लोकसहभागाने कोणता चमत्कार घडू शकतो, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न म्हणून या उपक्रमाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. तसे झाल्यास भविष्यात अन्य महामार्गाचा प्रवासही एका नव्या हरितक्रांतीच्या दिशेने सुरू होईल..

‘रुजवाई’ सर्वत्र शक्य!
मुंबई-आग्रा महामार्गाच्या परिसरात ‘हरियाली’ संस्थेने हाती घेतलेले ‘रुजवाई’ अभियानासारखे उपक्रम लोकसहभागातून अन्य ठिकाणीही राबवले जाऊ शकतात. त्यासंबंधी अधिक माहितीसाठी संस्थेचे पूनम सिंगवी यांच्याशी मोबाइल क्र. ९३२३२९१८९० किंवा ०२२-२५४७४११९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

1 thought on “Road to the Nature that is full of Life

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *