रुंदावणारे महामार्ग रोडावणारे महावृक्ष

रुंदावणारे महामार्ग रोडावणारे महावृक्ष 
हरियाली और रास्ता
पूनम सिंगवी, संस्थापक, हरियाली संस्था.

आ पल्या परिसरातील छोटे-मोठे रस्ते, जलवाहिन्या आदिंच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांच्या बिया रुजवत वृक्ष लागवडीचे कार्य हरियाली संस्थेतर्फे सतत १४ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ (मुंबई-आग्रा रोड) वरील ठाणे ते धुळे या सुमारे ३५० कि. मी. च्या पट्टय़ाची निवड करायचे संस्थेने ठरविले. काही प्राथमिक गोष्टींचा विचार झाल्यानंतर रस्त्यांची विस्तृत पाहाणी, त्यांच्या बांधकामाचे दंडक व मापदंड, कायद्याच्या तरतुदी, चित्रीकरण, कामाच्या दृष्टीने विभागणी, जनसंपर्क आदी कामांना सुरूवात केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली की, या सर्वच गोष्टी लोकांच्या कळत-नकळत फार मोठय़ा प्रमाणावर आणि आमूलाग्रपणे बदलत आहेत. हे बदल चांगले की वाईट हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो आणि ही चर्चा न संपणारी असू शकेल. मात्र या बदलत्या स्वरुपाची दखल घेणे आवश्यक आहे.
नेमके काय बदलते आहे ? आपण राष्ट्रीय महामार्गाचा विचार करीत आहोत. ‘आधीचे’ आणि ‘आताचे’ असा विचार करताना आपण सोयीसाठी स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर असा काळ घेऊ या. आधीचे महामार्ग सर्व प्रकारच्या रहदारीसाठी मुक्त असत. पांथस्थ, बैलगाडी, घोडागाडी, उंट तसेच घोडेस्वार, सायकल, चारचाकी अशी सर्व प्रकारची वाहने त्यावरून ये जा करू शकत. ही रहदारी तुलनेने धीम्या गतीने जाणारी होती. मात्र त्या सर्वाच्या केंद्रस्थानी माणूस होता. त्या माणसाची सोय-गैरसोय, त्याच्या गरजा आदी सर्व लक्षात घेऊन या रस्त्यांचे नियोजन केले जायचे. रस्ते त्या मानाने अरूंद म्हणजे एका वेळी दोन्ही बाजूंनी मिळून साधारणत: दोन वाहने (सर्वच प्रकारची) जाऊ शकत. शिवाय दोन्ही बाजुंना पाथस्थांसाठी कच्ची वाट देखील असे. त्यानंतर त्या रस्त्यांच्या दुतर्फा ठराविक अंतरावर म्हणजे साधारणत: १५-१५ फुटांवर उभे वाढणारे, दाट सावली देणारे, रस्त्यांवर सावलीची कमान निर्माण करणारे वड, पिंपळ, कडुनींब, चिंच आदी महावृक्ष लावले जात. त्या सर्वाना नंबर दिलेले असत. त्यामुळे कुठे एखादा वृक्ष पडला अथवा त्याची चोरी झाली तरी कुठल्याही उपग्रहांकित चित्राशिवाय त्याची दखल घेणे शक्य होत असे. या रस्त्यांच्या मध्ये विभाजक (की दुभाजक?) नसत. कुठल्याही ठिकाणी रस्त्यावरून जाणारे वाहन अथवा व्यक्तीला आपली दिशा बदलून उलट दिशेने देखील जाता येत असे. या रस्त्यानेच आजू-बाजूच्या शेतांमध्ये जाण्यासाठी, छोटय़ा-मोठय़ा गावांना जोडणाऱ्या वाटा,  छोटे उपमार्ग असत. हे रस्ते गावांना वळसे घालून जाणारे नव्हे, तर गावांना तसेच माणसांना जोडणारे होते! रस्त्याने बराच वेळ चलून अथवा वाहन चालवून थकायला झाले तर थोडी मोकळी जागा बघून एखाद्या महावृक्षाखाली त्याच्या शीतल सावलीत अथवा बाजूच्या शेतात शिरून देखील थोडा वेळ विश्रांती घेता येत असे. डबे (दशम्या) खाता येत. वाटेवर हॉटेल नावाचे प्रकार कमी असत. परंतु, दूरवर जाणारे प्रवासी आपापले डबे (दशम्या) बरोबर ठेवत व त्याचा मुक्त आनंद लुटत असत. झालेच तर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरील चिंचा, बोरे, पेरू, आवळा अशी फळे तोडून त्यांचा आस्वाद घेता येत असे. अनेक ठिकाणी असे रस्ते रानावनातून जाताना वेगवेगळी वळणे घेत, छोटे-मोठे घाट निर्माण करीत ! या घाटातून जातानाच आनंद काही वेगळाच असे.
आधी रस्ते बांधण्यासाठी लागणारा दगड, मुरूम, माती, खडी हे जमीन खणून वर काढले जात असे. आज त्यासाठी धाडधाड आवाज करणाऱ्या यंत्रांचा वापर करत डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त केले जातात व त्यातून ही गरज भागवली जात असते. आज माणसाला वेगाचा ध्यास लागलेला आहे. त्याला धीम्या गतीने जाणारी वाहने नको आहेत. त्यामुळे साहजिकच वेगवान वाहनांना अती वेगाने जाता येईल, अशा प्रकारचे राजमार्ग निर्माण व्हायला लागले आहेत. प्रत्येकाला अती वेगाने या राजमार्गानी राजधानीकडे धावत जायची आस लागलेली आहे. त्यासाठी वाटेत वळणे, आड वाटा, वृक्षांच्या सावल्या, त्यांच्या फांद्या, त्यांची फळे-पाने फुले आदी पडून निर्माण होणारा कचरा, मध्येच दिशा बदलून बाजुला अथवा उलट दिशेने जाणारी वाहने, रस्त्यांवर मध्येच थांबणारी वाहने, पायी चालत जाणारी माणसे, घोडागाडी, बैलगाडी आदी प्राणीजन्य वाहने, गावांची गर्दी, घाट आदी काही म्हणजे काहीच नको आहे. रस्त्याच्या केंद्रस्थानी माणूस नव्हे, तर वेगाने जाणारे वाहन आले आहे. साहजिकच या वेगाच्या आड येईल त्या साऱ्यांचे समूळ उच्चाटन होत आहे. त्याला महाकाय वृक्षांचा तरी कसा अपवाद असू शकेल? रस्त्याच्या आड येईल त्याला आडवा कर आणि वेगाने काम कर अशाच सूचना या काम करणाऱ्या यंत्रांना दिलेल्या असतात. त्या यंत्रांना चालविणारी माणसे देखील यंत्र बनूनच यंत्रवत काम करू शकतात. त्यांना भोवतालचा परिसर, माणसे, पशु-पक्षी, पर्यावरण वगैरेचे काहीच सोयरसुतक नसते. सोयीचे असेल तेव्हा कायदे व करारातील तरतुदींचा आधार घ्यायचा. गैरसोयीचे असेल तेव्हा तिकडे दुर्लक्ष तरी करायचे किंवा त्याला आडवळणाने वळसा तरी घालायचा !
या वेगाशी जुळते घेण्यासाठीच आमचे महामार्ग अधिकाधिक रुंद करण्यात येत आहेत. आधी फार तर दुपदरी असणारे रस्ते आता किमान चार पदरी अथवा सहा पदरी तरी करण्यात येत आहेत. विकास वाढीचा दर आणि वेग वाढवायचा असला तर हे सारे करणे आवश्यकच आहे असा एक समज असू शकतो. या महामार्गाचे रुंदीकरण करताना नजिकच्या काळात ते सर्व सहा पदरी होतील अशा दृष्टीने रस्त्यांसाठी शासन जागा घेत असते. अशा रस्त्यांची आखणी करताना दोन्ही बाजूकडील मिळून त्यांची गरज साठ मीटर रुंदीची असेल असा दंडक ठरविला गेला आहे. या साठ मीटर रुंदीची विभागणी ठरवून दिली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रस्त्यांची एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची रुंदी साठ मीटर असायला हवी. म्हणजेच मधोमध ३० मीटरवर त्याचा केंद्रबिंदू घेऊन त्याची दोन भागात विभागणी करायची. मधोमध सुमारे २.५ ते ५.०० मीटरचा दुभाजक ठेवून उर्वरित जागेत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन, तीन मार्गिका, जास्तीची वाट, सव्‍‌र्हिस रोड, जमिनीखालून टाकावयाच्या केबल्स ई-साठी जागा, ड्रेनेज आदी सर्व गोष्टींची आखणी अशी होते की दोन्ही बाजुंनी प्रत्येकी सुमारे २९ मीटर जागा व्यापली जाते. प्रत्येक बाजुला उर्वरित एकेका मीटर जागेत तीन-तीन मीटरच्या लांबीत फक्त करारात ठरलेले असेल ती झाडे ठराविक पद्धतीने लावायची. असे करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर टाकली जाते. त्याप्रमाणे त्याने ती पार पाडावी अशी अपेक्षा असते. मात्र दोन्ही बाजुला प्रत्येकी एका मीटरपेक्षा अधिक जागा वृक्ष लावायला शिल्लकच नसते.
हे सारे लक्षात घेतले तर एक गोष्ट स्पष्ट होते. जेवढी जागा सरकार या माहामार्गासाठी आपल्या संबंधित खात्यांकडून उपलब्ध करून घेते त्याच्या दोन्ही बाजुला फक्त एक-एक मीटर जागा वृक्ष लागवडीसाठी राखून ठेवलेली असते. त्या जागेवर लांबीच्या रेषेवर तीन मीटर अंतरावर एक सोडून एक अशा तीन रांगांमध्ये (म्हणजेच रुंदीच्या प्रमाणात फक्त एकेक फूटावर) करारात निर्दिष्ट केलेली असतील अशी झाडे (त्यांना ‘वृक्ष’ असे म्हणायचे ?) लावून त्याची देखभाल आणि रक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या कंत्राटदारावर टाकण्यात आलेली असते. अशा एका मीटरवर अथवा महामार्गासाठी राखून ठेवलेल्या साठ मीटर रुंदीच्या जागेत वृक्ष लागवड अथवा बीजारोपण करण्यास इतर कोणालाही कायद्याने परवानगी नसते. त्यांच्या पलीकडे असे काही करायचे असले तर त्यासाठी महामार्ग प्रशासन अथवा कंत्राटदारांची परवानगी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण ती जागा त्यांच्या मालकीची अथवा अधिपत्याखाली येत नाही. त्यामुळेच अशा जागेवर वृक्ष लागवड अथवा बीजारोपण झाले तर त्याचे श्रेय कंत्राटदाराला मिळेल, असा देखील गैरसमज करून घेऊ नये.
या परिस्थितीत आपल्यासमोर पर्याय उरतात ते फारच मर्यादित असतात. एक तर तोडल्या जाणाऱ्या वृक्षांसाठी हळहळ करीत बसायचे अन्यथा त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासन आणि कंत्राटदारांवर न्यायालयीन कारवाई करण्याचा बडगा दाखवीत आधी नवीन वृक्ष लावा आणि मगच रस्त्यांचे काम सुरू करा असा पवित्रा घ्यायचा. तिसरा मार्ग असतो तो इतर सर्व कारवाईचे मार्ग खुले ठेऊन जनसहभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने अधिकाधिक वृक्ष लावत राहण्याचा. महामार्गावरील महावृक्षांची हानी अंशत: का होईना, परंतु भरून काढत राहण्याचा हा मार्ग महाखडतर असतो. परंतु, भविष्याच्या दृष्टीने तो फार परिणामकारक ठरू शकतो. म्हणूनच ते एक आव्हान असते आणि समाजातील सकारात्मक शक्ती एकत्र येऊन काही काम करू लागल्या तर काहीही अशक्य नसते. तेव्हा सर्वानी आता या कार्यात सहभाग नोंदवावा आणि आवश्यक त्या माहितीसाटी ९३२३२९१८९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन आम्ही करीत आहोत.     

महामार्ग रुंदीकरण असो की शहरात उभारावयाचे विविध प्रकल्प असोत या प्रक्रियेत त्या त्या ठिकाणच्या वृक्षांचा बळी जात असतो. त्यामध्ये पर्यावरणाची मोठी हानी होत असली तरी नागरिकरणाच्या आणि विकासाच्या प्रक्रियेत ते अनिवार्य आहे. त्यामुळे विकासाचे प्रकल्प तर साकारले पाहिजेत पण पर्यावरणाची हानीही कमीतकमी व्हायला हवी या दृष्टीकोनातून विचार होणे इष्ट ठरेल. सध्या स्थानिक पातळीवरच्या अनेक निसर्गप्रेमी संघटना त्यासाठी पुढे येत असल्याचे दिसते. त्यांचे हे प्रयत्न आश्वासक खचितच आहेत. पण, त्याला अधिक योग्य दिशा मिळावी, त्याद्वारे इतरांसाठीही एक आदर्श ‘मॉडेल’ निर्माण व्हावे या हेतूने ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ व ‘उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त’मध्ये प्रस्तुत मालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे. हे व्यासपीठ सर्वाना खुले असून या विषयाची सर्व बाजुंनी चर्चा होणे अपेक्षित असल्याने वाचकांची मते, सूचना, अभिप्राय यांचे स्वागतच होईल. अधिक माहितीसाठी ०२५३-२५७११६५ अथवा २३१०४४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.