महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘हरियाली’ प्रणित महाबीजारोपण अभियान

मराठीवर्ल्ड > घडामोडी - मुख्य पान

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘हरियाली’ प्रणित महाबीजारोपण अभियान

वेगवेगळे विकास प्रकल्प आणि अन्य कारणास्तव होत राहणार्‍या वृक्ष आणि वनसंपत्तीची, अशंत: का होईना, जनसहभागातून भरपाई करीत राहाण्याच्या रचनात्मक कार्याला हरियालीने सुमारे चौदा वर्षापूर्वी सुरूवात केली. या कार्यातंर्गत विविध मार्ग आणि तंत्रांचा वापर करीत लक्षन् लक्ष वृक्ष लावण्याचा ध्यास घेतला. होरपळून काढणारे वणवे, धारदार कुर्‍हाडी आणि करवत, मुळासकट उपटून काढणारी जेसीबी यंत्रे, दिसेल तो हिरवा पाला ओरबाडत राहाणारी क्षुधार्त गुरे, आ‍दी सर्व घटकांचा सामना करीत आजवर लाखो वृक्षांची निर्मिती वेगवेगळया ठिकाणी या श्रमदान यज्ञातून होत आलेली आहे. ह्या कार्याचाच जोडभाग म्हणून जलसंवर्धन व पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करीत राहण्याचे कार्य संस्था सातत्याने, कुठल्याही प्रकारच्या फलाची अथवा सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता करीत असते. समाजातील वेगवेगळे घटक आणि स्तरातून होत राहाणारा व्यापक जनसहभाग, विद्यार्थी, युवक आणि औद्योगिक जगतातील कर्मचार्‍यांचे श्रमदान व स्वेच्छा देणग्या, प्रखर सामाजिक जाणिवा असलेल्या, निरपेक्ष काम करीत राहणार्‍या, वयाचे आणि प्रकृतीचे बंधन झुगारून आघाडीवर मार्गदर्शन करीत राहणारे सेवाभावी नागरीक ही संस्थेंची ताकद आणि प्रेरणा आहे.

याच कामाचा विस्तार म्हणून संस्था गेली पाच वर्षे वारकर्‍यांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर स्थानिक मातीत सहज रूजून येणार्‍या वेगवेगळया उपयुक्त वृक्षांच्या बीयांचे वाटप आणि रूजवण करीत आलेली आहे. वारकर्‍यांनी वारीच्या वाटेवर तर अशा बीया रूजवल्याच परंतु आपापल्या गावी देखील त्या नेऊन त्यांचे रोपण केले. त्यामुळेच आज निसर्ग निर्मिती आणि भरपाईचा संदेश महाराष्ट्राच्या गावागावातून पोहोचण्यास मदत होत आली आहे.

अशा रितीने कुठल्याही सरकारी योजना अथवा मदतीवर अवलंबून न राहाता, व्यापक जनसहभागाच्या माध्यमातून रचनात्मक कार्य करीत राहाण्याच्या संस्थेच्या कार्याचा पुढील एक टप्पा येत्या पावसाळयाच्या सुरूवातीलाच (२५ ते २७ जून २०१०) गाठण्याचा एक उपक्रम राबविण्याचे संस्थेने ठरविले आहे.

त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, मुंबई-आग्रा वरील ठाणे ते धुळे या सुमारे ३५० कि.मी. रस्त्याच्या रूंदीकरणाचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. त्यात हजारो सुंदर सुंदर आणि प्राचीन वृक्षांख बर्‍याच प्रमाणात अनिवार्य बळी गेलेला आहे. त्याची भरपाई कोणी आणि कशी करायची? हे काम सरकार आणि कंत्राटदारांवरच केवळ सोपवून लोकांनी गप्प बसायचे काय? इतरत्र नेहमी आपण बघत असल्याप्रमाणे अशा यंत्रणा आपली जबाबदारी आणि कर्तव्या पार न पाडता त्यातून पळवाटा शोधण्याचाच प्रयत्न करीत असतात. न्यायालयीन कारवाई हा एक भाग असू शकतो. मात्र ही प्रक्रिया देखील दीर्घकालीन, अपुरी आणि जनहिताशी बरीचशी विसंगत अशी होत जाताना दिसते. अशा वेळी लोकांनीच एकत्र येऊन आपल्या हिताच्या दृष्टीने थोडासा वेळ, पैसा आणि श्रमाचा भाग देत आपल्या स्वत:च्या परीसराच्या आणि भावी पिढयांसाठी थोडे काम करणे आवश्यक ठरते.

हे लक्षात घेऊनच हरियालीने येत्या २५ जून (शुक्रवार-शनिवार-रविवार) याकाळात ३५० कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा लोकांच्या सहभागातून मोठया प्रमाणावर उंच वाढणार्‍या वृक्षांच्या बीयांचे रोपण करण्याच्या महाअभियानाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या क्षेत्रात कार्य करणार्‍या अनुभवी लोकांच्या सल्ल्यानुसार वृक्षांच्या बीयांची निवड करायच्या कामाला सुरूवात झालेली आहे. आवश्यक त्या यंत्रणेची परवानगी आणि योगदान मिळविण्याच्या दृष्टीने भेटी घेण्याचे काम चालू आहे. या रस्त्यालगत असलेली छोटी-मोठी गावे, शहरे इ. ठिकाणी पर्यावरण रक्षण करणार्‍या संस्था, इतर सामाजिक व सेवाभावी संस्था, नागरिक, शाळा, महाविद्यालये आदिंशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांना देखील सुरूवात झालेली आहे. समाजाच्या या सर्व घटकांनी या महाभियानात सहभागी होत आपले योगदान द्यावे असे आवाहन हरियाली तर्फे करण्यात आले आहे. यासाठी लागणार्‍या सुमारे एक कोटी बीया हरियाली तर्फे छोटया, छोटया पाकीटांमधून हव्या तेवढया संख्येने विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत. या बीया रूजविण्यासाठी हरियालीने कोणालाही सहज वापरता येईल अशा एका चपटया, धारदार टोकाच्या आणि वजनाने हलक्या असणार्‍या पहारीची निवड केली आहे. ज्या संस्थांना अशा रोपण्या हव्या असतील त्यांना त्या मागणीप्रमाणे माफक दरात पुरविण्यात येतील.

यासर्व कामाचे आयोजन करण्यासाठी हरियालीने गथित केलेल्या समितीचे सदस्य खालीलप्रमाणे यामार्गाने संपर्क यात्रा करणार आहेत:-

१) प्राथमिक संपर्क चर्चा आणि संगठन – १० ते १५ मे २०१०
२) द्वितीय संपर्क दौरा व कार्यक्रमाची आखणी – १ ते ५ जून २०१०
३) तृतीय संपर्क यात्रा – बीया व अवजारवाटप
४) कार्यक्रमाची अतिंम आखणी – २३ व २४ जून २०१०
५) प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी २५ ते २७ जून २०१०

या सर्व कामाचे नियोजन करतांना सुयोग्य अंमलबजावणीसाठी विभागवार समित्या नेमून त्यांची कार्यकक्षा ठरवून देण्यात येईल. या रस्त्याचे काम केलेल्या सर्व कंत्राटदारांशी संपर्क साधून त्यांचे पूर्ण योगदान मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येतील. किंबहूना हे त्यांचेच काम असून त्याची पूर्तता व्हावी अशा दृष्टीने सार्वजनिक हित डोळयासमोर ठेवूनच या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. याची सुयोग्य जाणिव त्यांना करून द्यायचे देखील प्रयत्न व्हायचे आहेत. प्रयत्नांना यश येणे न येणे हे विधात्याच्याच हाती असणार आहे.

या सर्व कामासाठी करंज, कांचन, बहावा, चिंच, विलायती चिंच, कडूनिंब, बांबू, पर्जन्यवृक्ष, रतनगुंज, सुरंगी, लोखंडी, गुलमोहोर, पीत गुलमोहोर, गिरीपुष्प (उंदीरमारी) आदी वृक्षांच्या तसेच मुरूड शेंग, वावडींग आदी औषधी वनस्पती व लहान झाडे यांच्या सुमारे चार टन बिया हरियाली तर्फे श्रमदानाने गोळा करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या मार्गालगत व जवळपासच्या परिसरात कार्यरत असणार्‍या संयुक्त वनव्यवस्थापन समित्या, आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट आदींकडून सुयोग्य भावाने करण्यात येतील. या सर्वांनी तसेच या महाभियानात सहभागी होऊ इच्छिणार्‍या सर्वच संस्था व व्यक्ती आदिंनी प्रकल्प प्रमुख श्री. पुनम सिंगवी यांच्याशी ९३२३२९१८९० अथवा ०२२-२५४७४११९ या क्रमांकावर अथवा punamsigavi@mtnl.net.in या ई-मेल पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन हरियाली तर्फे करण्यात येत आहे.

शुक्रवार दि. २५ जून रोजी वटपौर्णिमा आहे. यंदाच्या वटपौर्णिमेला वटवृक्षाच्या फांद्या तोडून घरी पूजा करायच्या ऐवजी महिलांनी या अभियानात सहभागी होत आपली मनोकामना पूर्ण करण्याची साद ईश्वराला घालावी असे नम्र आवाहन करावेसे वाटते. त्यासाठी आतापासूनच आपण आपापल्या परिसरातील वेगवेगळया वृक्षांच्या बीया, आंब्याच्या कोयी, जांभूळ, चिंच आदींच्या बीया जमवायला सुरूवात करू या जेणेकरून द्रव्याचा कमी उपयोग करीत अधिकाधिक जनसहभाग, श्रमदान आणि स्वसामर्थ्यावर आपण असे प्रकल्प राबविण्याचा संकल्प करीत तो प्रत्यक्ष अंमलात आणू या.

संपर्क दौर्‍यांदरम्यान सर्व सेवाभावी नागरिकांशी अधिकाधिक विचारांची देवाणघेवाण होऊ याकेल अशी आशा हरियालीचे कार्यकर्ते बाळगून आहेत.

महाराष्ट्र राज्‍य निर्मितीच्या सुवर्ण वर्षानिमित्त आपण सर्वसामान्य माणसांनी हरित महाराष्ट्राचे स्वप्न बघून ते अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला काय हरकत आहे?

पुनम सिंगवी
punamsingavi@mtnl.net.in